असामान्य

आपल्या आयुष्यात बरीच माणसं असतात, काही मित्र तर काही नातलग, काही जवळची तर काही ओळखीची; काही सामान्य तर काही असामान्य!
एखादा माणूस सामान्य आहे की असामान्य हे बहुतांशी पाहणाऱ्या नजरेवर अवलंबून असतं असं मला कधी कधी वाटतं. आपल्याला जसं जगायचं तसं जगणारा माणूस आपल्या नजरेत असामान्य आणि जे आपण जगतोय तसं जगणारी माणसं सामान्य, अशी एक असामान्यतेची ढोबळ कल्पना मनात येते.
आता कुठलीच गोष्ट अशक्य नाही हे जर आपण मानलं, तर सामान्यतेकडून असामान्यतेकडे जाण्याचा सुद्धा रस्ता आहे यावर काही दुमत होणार नाही. मग वाटतं की जर असं आहे, तर मग सगळे लोक का नाही प्रवास करत त्या रस्त्यावरून असामान्य होण्यासाठी?
या प्रश्नाचं उत्तर शोधताना जाणवलं की माणसापेक्षा त्याचा त्या रस्त्यावरून प्रवास करण्याचा निर्णय घेणं असामान्य आहे, रोज स्वतःचं सत्व पणाला लाऊन त्या रस्त्यावरून प्रवास करत राहणं असामान्य आहे.
कोणीही सेल्फ मेड नसतं, हे ही तितकंच खरं आहे, कुठलीही गोष्ट एकट्याने होत नाही. त्या माणसाची त्याच्या प्रवासात साथ करताना सामान्यत्व स्वीकारणारी त्याच्या आजूबाजूची माणसं सुद्धा तेवढीच असामान्य असतात. जगाला वाटणार नाहीत कदाचित, प्रसंगी त्यांनासुद्धा ते उमगत नाही; पण सूर्य जळतो म्हणूनच पृथ्वीवर जीवन आहे.