रविवार, फर्स्ट क्लास आणि ब्रोच्या

रविवार सकाळचा दिवस, माझी १२ वाजता कल्याणला एक मीटिंग होती, सकाळी सकाळी मस्त थालीपीठाचा नाश्ता करून १०.४३ च्या लोकल मध्ये बसलो. आता रविवारच्या सकाळी वास्तविक फार लोकं नसायला हवी, पण आज जरा गर्दी दिसत होती, कल्याण ला उतरायचं म्हणजे कर्जतच्या बाजूने पहिल्या फर्स्ट क्लास मधे बसायचं, कारण उतरलं की शेजारी escalator येतो. माझ्या विसरभोळ्या आळशी जीवाने हे बाकी मस्त पाठ केलंय. 😂 पण त्या डब्यात बरीच टाळकी होती, म्हणजे बसायला जागा होती, पण खिडकी नव्हती. 😂 म्हणून मी आपला खिडकीच्या तपश्चर्येत पुढच्या फर्स्ट क्लास पर्यंत लेफ्ट राईट करत गेलो, तिथेही ६-७ टाळकी होती पण मला आवडते ती खिडकी रिकामी होती, आस्तिकाला देव भेटल्यावर जसा आनंद होईल, तसं काहीसं मला झालं आणि मी पटकन येऊन बसलो.
माझ्या समोर कोणी नव्हतं, फक्त कडेला थर्ड सीटवर एक काकू पायावर पाय टाकून बसल्या होत्या. मला आत जाता यावं म्हणून त्यांनी पाय खाली केले, मी गेल्यावर परत वर केले, ऑटोमॅटिक मशीन सारखे, मला मजाच वाटली. आता रविवारच्या सकाळी प्रवास करणारे निवांत जीव आम्ही, मी सुद्धा बूट काढून पायावर पाय टाकून निवांत बसलो आणि विचार करायला सुरुवात केली, कारण काल परवा कामाच्या गडबडीत आणि घरच्या पाहुण्यांमुळे मला ब्लॉग लिहिता आला नव्हता, आणि सकाळी नाश्ता करता करता आलेल्या पाहुण्यांबद्दल गप्पा मारता आईने मला विचार वगैरे करायची परवानगी दिली नव्हती.
असाच विचार करता करता डब्यात नजर टाकली असता बसलेली इतर काही टाळकी सुद्धा दिसली, समोरच्या कंपार्टमेंट मध्ये वारकरी वेशात एक आजोबा बसलेले कोणासोबत तरी, आणि बाजूच्या कंपार्टमेंट मध्ये भाडिपाचा ‘ब्रोच्या’छाप टी-शर्ट घातलेला आणि झुपकेदार पांढऱ्या केसांचा एक ५०–५५ वर्षाचा इसम आपल्या एका संपूर्ण पडीक शेताच्या फिकट निळ्या रंगाच्या शर्ट घातलेल्या मित्रासोबत बसला होता, समवयस्कच असावेत दोघं. प्रत्येक जण आपापल्या प्रायवेट जगात मग्न होता. For a change, कोणाच्या हातात मोबाईल नव्हते, म्हणून मग मी मोबाईल काढला. 😂
मला आयुष्याच्या हार्मनी वर लिहायची इच्छा होती, त्या ब्लॉगला मी ‘ये हँसता हुआ कारवाँ ज़िन्दगी का’ नाव देणार होतो कारण आयुष्याकडे जरा झूम आऊट करून पाहिलं की किती सुंदर वाटतं, कुठला ही प्रॉब्लेम, कुठलीही परिस्थिती, त्रस्त वाटतं नाही, कारण ते त्या दिवशी मोठं असतं पण ‘In the grand film of life, it isn’t even a scene.‘ या धरतीवर विचार करता करता गाडी कधी सुटली कळलंच नाही, प्रस्तावना लिहून होत असताना माझ्या कंपार्टमेंट मध्ये असणाऱ्या काकूंची एक मैत्रीण येऊन त्यांना जॉइन झाली होती आणि त्यांच्या ही गप्पा सुरू झाल्या होत्या समोरासमोर बसून, ‘पॉडकास्ट’च जणू, ज्याचं शेवटचं वाक्य – ‘जाऊदे ना, आपल्याला काय करायचंय, त्यांचं ते बघतील.’ असंच असावं. आपण तरी वेगळं काय करतो म्हणा. 😂😂
हे सगळं होत असताना अचानक ‘ब्रोच्या’ आणि पडीक शेत उठून वगैरे माझ्याकडे आले आणि जणुकाही मी त्यांच्या मुलीला लग्नाची वचनं देऊन पसार झालो असल्याच्या सुरात मला सुनवायला सुरुवात केली.
‘ब्रोच्या’ (नाकातून) – अरे ए, कळत नाही का तुला. पाय खाली घे ना.
माझी लागलेली तंद्री तुटली, मी वर पाहून त्यांना विचारलं
मी – काका काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का?
‘ब्रोच्या’ – सांगितलं ना, पाय खाली घे. लोकल मध्ये बाकीचे ही आहेत. कळत नाही का कसं बसायचं ते.
मी – काका माझ्या समोर कोणीच बसलेलं नाहीये, गाडीत गर्दी सुद्धा नाहीये, कोणी आलं की ठेवेन पाय खाली. तुम्ही इथे बसणार असाल तर आता घेतो पाय खाली.
‘ब्रोच्या’ – नाही. आत्ता ठेव. चार चौघात कसं वागायचं कळतं की नाही तुला? फर्स्ट क्लास मध्ये कसं वागतात ते शिक आधी.
अशा परिस्थितीत आपल्या मनाच्या दोन बाजू असतात, ID आणि Superego, आणि यांच्यात समन्वय साधणारा Ego.
Superego म्हणजे आपल्याला दुसऱ्या जागी ठेवून प्रथम स्थानी समाज, लोकमर्यादा, चूक बरोबर या गोष्टींना ठेवणारी आपली बाजू. आणि ID म्हणजे आपल्या स्वतःला प्रथमस्थानी ठेवून वागणारी आपली बाजू. ८०% वेळी माझ्या वर्तनात Superego डॉमिनंट असतो. ज्यामुळे मी नेहमी Morally नीट वागायचा प्रयत्न करतो. आता वास्तविक तिथे खरंच कोणी बसणारं आलं असतं तर मला पाय खाली ठेवलेच असते, सांगायची गरजच नव्हती. पण माझा ID रविवारी सकाळी रिकाम्या लोकल मध्ये या ‘ब्रोच्या’ची दाढी नक्कीच खाजवणार नव्हता. क्षणार्धात ID ne Superego ला सांगितलं – Let Me Handle This ब्रोच्या.
मी – कोणी येई पर्यंत पाय खाली घेणार नाही. तुम्हाला नक्की काय प्रॉब्लेम आहे? तुम्ही पण हात पसरून बसलाच होता ना 2 सीट वर, एक पाय दुसऱ्या पायावर टाकून, निवांत. तसंच हे माझं निवांत आहे. बरं तुमचं जाऊद्या पण या काकूंची मैत्रीण यायच्या आधी या पण माझ्या बाजूला पाय टाकून बसलेल्या आरामात, त्यांना तुम्ही हे फर्स्ट क्लास शिक्षण नाही दिलंत! माझ्यावर कशाला चढताय?
‘ब्रोच्या’ – त्या नव्हत्या बसल्या अशा.
मी – विचारा त्यांना. मी आलो तेव्हा मला जाता यावं म्हणून त्यांनी पाय खाली केले फक्त. परत वर केले.
ब्रोच्याने काकूंकडे पाहिलं, त्यांनी होकारार्थी मान डोलावली. आता काय बोलायचं याचा विचार ‘ब्रोच्या’छाप करत असताना रिकाम्या लोकल मध्ये दाराशी लटकलेला एक ४८ किलोचा इसम या सगळ्यात उडी मारून म्हणाला, ‘तेव्हा गाडी सुटली नव्हती’
मी (हसत) – गाडी सुटताना रेल्वेची माणसं सीट बदलून जातात का? 😂
काकूंनी होकारार्थी मान डोलावल्यावर मला वाटतं ‘ब्रोच्या’ क्लीन बोल्ड च झाला होता. 😂 तेवढ्यात पडीक शेताला काय हुक्की आली काय माहिती,
पडीक शेत – एवढी ३ लोकं तुला बोलतायत तरी तू पाय खाली नाही घेणार का?
मी – अजिबात नाही. पण नेरळच्या आधी नक्की घेईन, तेव्हा लोकं येऊ शकतात. त्यांना त्रास नाही देणार. तसा त्रास तर मी तुम्हाला ही देत नाहीये.
पडीक शेत (‘ब्रोच्या’सोबत त्याच्या जागेवर परत जात) – नाही नाही, तू असाच बस, कितीही लोकं आली तरी आता पाय खाली घेऊ नको, त्यांना सांग की मी असंच बसणार, तुम्ही दुसरी कडे बसा.
मी – तुम्हाला रविवारी सकाळी मजा आली ना कोणाला तरी तुमच्या मताप्रमाणे हे जगायला सांगून! झालं तर मग. तुमचा रविवार सार्थ झाला. आता माझं मी बघून घेईन. लोकं लोकांचं बघून घेतील, तुम्ही तुमचं बघा.
एव्हाना ‘ब्रोच्या’ चे हरवलेले थोडेसे शब्द घरी परत आले होते. माझ्याकडे कटाक्ष टाकून तो पडीक शेताला म्हणाला, फर्स्ट क्लास मध्ये कसं वागायचं कळतं की नाही लोकांना.
मी – काका क्लास नुसार बदलतो तो माणूस कसला. मी आहे असा आहे.
तेवढ्यात रेल्वेची ताई ‘पुढील स्टेशन – नेरळ’ म्हणाली, मी पाय खाली घेतले. आणि तेवढ्यात लोकलच्या कॅलेंडर मधे रविवार वगैरे काहीही नसतं असं म्हणत गर्दी आली, माझ्या समोर, आजू बाजूला कुठल्या तरी कॉलेज ची पोरं येऊन बसली आणि बुद्धिबळ खेळायला बसली. मी आपला यांनी या app मध्ये pass and play कसं चालू केलं असेल याचा विचार करत आणि त्याच्या पैकी एका मुलावर मनोमन बेट लावली.
मस्त मीटिंग करून १२.४४ ची कर्जत लोकल पकडली, डब्यात ३ लोकं होती, पायावर पाय टाकून मस्त गाणी ऐकत चालली होती, आपापल्या प्रायवेट जगात मग्न.
डोक्यात ’मै पल दो पल का शायर हूं’ चा अमिताभचा मोनोलॉग फिरत होता –
कल नई कोंपलें फूटेंगी
कल नए फूल मुस्काएँगे
और नई घास के नए फर्श पर
नए पाव इठलाएंगे
वो मेरे बीच में नहीं आए
मैं उनके बीच में क्यों आऊँ?
उनकी सुबहों और शामों का
मैं एक भी लम्हा क्यों चुराऊँ?
मैं पल दो पल का शायर हूं
पल दो पल मेरी कहानी है
पल दो पल मेरी हस्ती है
पल दो पल मेरी जवानी है