थकलेला ज्योतिषी आणि मानसशास्त्राचा विद्यार्थी

थकलेला ज्योतिषी आणि मानसशास्त्राचा विद्यार्थी - sadhuwani

चार दिवसांपूर्वीची गोष्ट आहे, एका कामानिमित्त दादरला निघालो होतो. नुकतीच दिवाळी झाली होती, मजबूत आराम केला होता, आणि मस्त चकल्या खाल्ल्या होत्या, आणि आता आतुरतेने कामाची वाट पाहत उत्साहात निघालो होतो. 

नेरळ गेलं, एका क्लायंटशी मी फोनवर बोलत होतो, त्यांना काही शंका होत्या ज्या मी फोनवर सोडवत होतो. अर्थात आता माझं बोलणं पु. लं. च्या रावसाहेबांसारखं, साधं कुजबुजणं सुद्धा फर्लांगभर अंतरावर ऐकायला जावं एवढं दिलखुलास. आणि लोकलची माणसं ’आपलं ठेवावं झाकून आणि दुसऱ्याचं बघावं वाकून’ या तत्त्वावर जगत आलेली आहेत. याच तत्वावर माझ्या शेजारचा माणूस मी काय बोलतोय हे यूपीएससी मध्ये येणारे या तन्मयतेने ऐकत होता आणि माझा फोन ठेवल्या ठेवल्या त्यांनी मला विचारलं तुम्ही रिल्स वगैरे करता का? 

माझ्या कानात वाजत असलेलं गाणं मी थांबवलं आणि त्यांना हो असं उत्तर दिलं. दहा सेकंद शांततेत गेली, मला वाटलं झालं, संपलं. मी आपलं खिडकीतून बाहेर बघत गाणं परत सुरु केलं. तर तेवढ्यात या गृहस्थाने आपल्यातल्या गटणे जागा करत माझ्या प्रतिभासाधनेमध्ये व्यत्यय आणत मला विचारलं, “मला शिकवाल का? मला इंटरेस्ट आहे या सगळ्यात. हवं तर पैसे देऊ नका मला नीट जमेपर्यंत.” मी त्यांना म्हटलं एक मिनिट थांबा, आणि माझे इयरफोन्स डबीत टाकले, डबी बॅगेत टाकली आणि म्हटला आता बोला. 

मी त्यांना विचारलं, “काय करता आपण?” त्यावर त्यांनी मला सांगितलं, “मी ब्राह्मण आहे!” हे उत्तर ऐकून मनातल्या मनात मी एवढा हसलो, म्हटलं हे कसलं प्रमाणपत्र हे काम मागायचं! पण म्हटलं असो, ऐकून तर घेऊ. मी त्यांना विचारलं, म्हणजे? त्यावर ते म्हणाले मी पूजा सांगतो आणि ज्योतिषी सुद्धा आहे. आता हे ऐकून माझ्या विनोदी मनात हे भटजीं सोहळं नेसून लॅपटॉप वर रील करताना आणि त्या रीलचं भविष्य सांगताना दिसले आणि मी वेडाच झालो. 😂

आता मी सुद्धा गप्पा मारायच्या मूडमध्ये आलो होतो, मी त्यांना विचारलं, तुमचं काम छान आहे की, तुम्हाला का या कामात यायचंय? ते म्हणाले ५१ वय झालं, आता गुडघे दुखतात त्यामुळे मांडी घालून बसता येत नाही, अवघड जातं बसून पूजा सांगायला. तर सध्या मी नेरळ सीएसटी पास काढलाय, रोज आपला चक्कर मारत असतो, विरंगुळा म्हणून. तुम्ही कुठे उतरणार? मी म्हटलं दादर, तर ते म्हणाले की छान बोलता येईल तो पर्यंत. मी म्हटलं, जरूर. आणि अशा रीतीने एक थकलेला ज्योतिषी आणि एक होऊ घातलेला मानसशास्त्र तज्ञ यांच्यातला संवाद सुरू झाला. 

मी: पहिल्या पासून हेच करता?

ते: हो, आता २५ वर्ष वगैरे झाली असतील. पण माझी पद्धत जरा वेगळी आहे. मी टिपिकल पद्धतीने कुंडली बघत नाही, मी माझ्या वेगळ्या पद्धतीने बघतो. त्यामुळे सगळ्यांनाच पटतं असं नाही. 

मी: काय वेगळं करता तुम्ही?

ते: मी कुंडलीसोबत त्या माणसाचा पण अभ्यास करून, त्याचं ऐकून त्याला सोल्युशन देतो. मी त्यांना सांगतो की मी कुंडली पाहून तुला सांगितलं तरी तू कृती केल्याशिवाय बदल घडणार नाहिये. मी किंवा ही कुंडली तुझी समस्या नाही सोडवू शकत, ती तुलाच सोडवायची आहे, ही कुंडली, मी, फक्त मार्गदर्शन करू शकतो. 

मी: म्हणूनच तुमच्याकडे गर्दी नसेल. 😂

ते: काही विचारू नका हो, एवढी विचित्र असतात लोकं.

मी: पण मला एक सांगा साहेब, कर्म केल्याशिवाय फळ मिळणार नाही हे सांगायला शनीची खरंच गरज आहे का हो? 

गुरुजी गालातल्या गालात हसले आणि म्हणाले,

ते: तुम्हाला नाहिये, पण आयुष्यात हरलेल्या लोकांना आहे. ज्योतिषाकडे येणारा माणूस कधीच कुतुहलाने येत नाही, आयुष्याकडून मार खाऊनच येतो, त्याला ग्रहांचाच आसरा असतो. 

मी: खरंय.

ते: एक उदाहरण देतो, एक तिशीतली मुलगी माझ्याकडे आली होती, काही केल्या लग्न जमत नव्हतं. घरात सुद्धा आई वडिलांशी सतत भांडणं. मी सगळं बघून सांगितलं की तुला वास्तू बदलावी लागेल, तरच होईल. ज्या घरी रोज भांडणं होतात, त्या माणसाची मनस्थिती काय असते, त्याच्याशी कोण लग्न करणारे. पण तिचं असं म्हणणं होतं की आई वडिलांचं कोण करणार, उतारवयात त्यांची सेवा करायलाच पाहिजे ना. मी म्हटलं करा ना, मी कुठे गाव सोडायला सांगतोय, अगदी समोरच्या गल्लीत गेलात तरी चालेल, पण तुमची मनस्थिती ठीक असेल तेव्हाच तुम्ही पण सुख द्याल ना त्यांना, आता रोज भांडणं करून तसंही काय सेवा देताय त्यांना तुम्ही. कुंडली सोबत कॉमन सेन्स पण तेवढाच महत्त्वाचा आहे की, पण पटलं नाही तिला, परत 2 वर्षांनी आली, काहीच झालं नव्हतं, मी तिला परत तेच सांगितलं, तेव्हा ऐकलं, वर्षभरात लग्न झालं.

मी: बरोबर आहे, आपण आनंदी असलो तर समोरच्याला आनंद देऊ शकतो, प्रसंगी जे निर्णय कठीण वाटतात ते नंतर सुख देऊन जातात. ते निर्णय घेण्याची धमक पाहिजे फक्त. 

अशा आम्ही अजून जरा वेळ गप्पा मारल्या, मग मला एक फोन आला, चर्चा थांबली, मी माझं काम संपवलं, आणि बाहेर पाहिलं, डोंबिवली येत होतं. या माणसाशी गप्पा मारता मारता एक तास निघून गेला होता. त्यांना मी कामाबद्दल सुद्धा सांगितलं, ते मला कशी मदत करू शकतात हेसुद्धा सांगितलं. आता मात्र मी जरा या ज्योतिषाला मिश्किलपणे छेडायचं ठरवलं आणि त्याला विचारलं. 

मी: विश्वास तर असेलच तुमचा, आता या धंद्यात आहात म्हणजे, पण देवाशी काय नातं आहे हो तुमचं? 

ते: म्हणजे काय?

मी: म्हणजे, तुमचं देवाशी कसं जमतं?

ते: बघा लोकांचं कसं असतं, सगळं फसलं की देवाकडे आणि आमच्याकडे येतात, मार्ग शोधायला. 

मी: मी लोकांबद्दल नाही तुमच्या बद्दल विचारतोय. तुम्हाला उदाहरण म्हणून माझं नातं सांगू का? म्हणजे तुम्हाला माझ्या प्रश्नाचा मतितार्थ कळेल.

ते: हो, बरं होईल, सांगा. 

मी: बरं, माझं असं म्हणणं आहे की देव असलाच, तरी तो आपल्यापेक्षा सुपेरिअर नाहीये, इक्वल आहे, असलाच तर तो माझा मित्र आहे. म्हणून कधी या मित्राशी बोलायची वेळ आलीच, तर मी त्याच्याशी गप्पा मारतो, त्याच्याकडे काही मागत बसत नाही. त्याला विचारतो, तुला काय हवंय भावा, बोल तू, करु आपण! एकदा गप्पा मारताना मला असं जाणवलं की माझा मित्र जरा वैतागलाय लोकांचं दुःख ऐकून, म्हणून मग मी त्याला म्हटलं, डोन्ट वरी ब्रो, काही लोकांचं मी ऐकतो. आणि म्हणून मी मानसशास्त्राचा अभ्यास करतोय, लोकांना समजून घेण्यासाठी, त्यांच्याशी नीट बोलता यावं, त्याचं ऐकता यावं यासाठी. त्यांना हसवता यावं यासाठी. खरंतर वाराणसीच्या घाटांवर चक्कर मारता मारता शंकराचा वेशभूषेत भेटलेला एक लहान मुलगा मला आठवतो देव म्हटलं की, सगळे लोकं त्याचा नमस्कार करतात, काही पैसे ठेवतात झोळीत, काही लोकं फोटो काढतात, आशीर्वाद घेतात पण कोणीच त्याच्याशी गप्पा मारत नाही. मी त्याच्याशी जाऊन १० मिनिटं गप्पा मारल्या, त्याला हसवलं, टाईमपास केला आणि हे करताना माझ्या एका मित्राने माझा एक खूप सुंदर फोटो काढला ज्याला मी कॅप्शन दिलं, हम तो भैय्या भगवान को भी हसा दे. हा बघा. 

असं म्हणून मी त्यांना फोटो दाखवला. 

ते: छान आलाय फोटो खरंच. पण खरं सांगू का, तुमच्यासारखं नातं नसतं कोणाचं देवासोबत, जे तुम्हाला गवसलं ते सगळ्यांना नाही मिळत, त्या मागे कारणं बरीच आहेत, तुमचं या जन्मीचं, पूर्वजन्मीचं पुण्य, कर्माचा हिशोब या सगळ्यानुसार ते असतं. एवढं सोपं नसतं ते. 

मगाशी पत्रिकेत कॉमन सेन्स शोधणारा हा गुरुजी आता पूर्वजन्मीच्या गोष्टी करतोय हे बघून याच्या विचारांची पोच किती उंच आहे याचा अंदाज आला मला. हा विचार मी करत असतानाच ते पुढे म्हणाले,

ते: लग्न झालंय का तुमचं? 

मी: अजून केलं नाहीये, लहान आहे मी अजून, २९ वर्षाचा. 

त्यावर गुरुजींनी माझ्याकडे इतक्या केविलवाण्या नजरेने पाहिलं की एका कुत्र्याच्या पायावरून गाडीच गेलिये, काही विचारू नका, मला हसायलाच आलं जरा त्यांचा लुक बघून. 

ते: व्हायला हवं होतं, लग्नसंस्कार हा १४ संस्कारामधला एक महत्वाचा संस्कार, तो व्हायलाच पाहिजे. नाहीतर माणूस नंतर मुंजा म्हणून भटकतो आणि त्रास देतो. 

मी: आता तुम्ही म्हणताय ते किती खरंय हे मला मेल्याशिवाय नाही समजणार, पण मी मुंजा झालो तेरी लोकांना त्रास देईन, हे जरा मला डाऊटफूल वाटतं, आख्खं आयुष्य लोकांना हसवण्यात चाललंय. मेल्यावर कशाला त्रास देऊ. 😂

ते: लोकं गेल्यावरच त्रास देतात हो, तुम्हाला नाही माहिती. मुक्ती नाही मिळत ना, त्या साठी जे करावं लागतं ते मुलानेच करावं लागतं. 

मी: प्रश्न मुलाचा असेल तर तो तसाही होईलच की, लग्न कशाला करायला पाहिजे त्या साठी. 😂😂

यावर गुरुजी दिलखुलासपणे हसले. 

ते: तसं नाही हो, त्याने केलं पण पाहिजे ना सगळं. नाहीतर काय फायदा. तुम्हाला सांगतो जिवंतपणी जे करता त्या पेक्षा माणसांचं गेल्यावर किती करता याला जास्त महत्त्व आहे. खूप करावं लागतं. 

मी: तुम्ही चुकीचे आहात असं मला म्हणायचं नाहीये, पण जिवंतपणी माणसांना आनंद देणं, त्यांना सुख देणं हे जास्त महत्त्वाचं वाटतं मला. आई वडिलांना त्यांच्या मुला–मुलींनी जिवंतपणी सुख दिलं तर त्यांना इथेच स्वर्ग नाही का मिळणार? आणि दुःख दिलं तर ते ही भोगायचंच आहे. मला तरी वाटतं सगळं इथेच भोगून जातो माणूस, ते म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी

माझ्या या वाक्याने गुरुजी जरा डगमगल्या सारखे झाले. पण स्वतःला सावरत ते म्हणाले. 

ते: बरोबर आहे, भिकारी असं नाही होत माणूस लगेच, ते जन्माला येताना त्याच्या नशिबात सटवाई जे लिहिते ते मिळतच त्याला, ते चुकत नाही, पण ते टिकवायचं की नाही ते त्याच्या कर्मावर अवलंबून असतं. आता माझंच बघा ना, आज २५ वर्ष झाली मी माझ्या आई वडिलांपासून लांब जाऊन. माझे निर्णय पटायचे नाही त्यांना. सारखे खटके उडायचे. मग मी राहता बंगला सोडायचा ठरवला, भावाला सांगितलं की तू त्यांची काळजी घे, त्यांच्या पश्चात राहता बंगला बाकी इस्टेट सुद्धा तूच घे, मला काही नको. वडिलांना मुलगा म्हणून मला एक फ्लॅट द्यायचा होता, तो मी स्वीकारला त्यांची इच्छा म्हणून. पण बाकी काही नाही. 

मी: नंतर भेटलात की नाही कधी त्यांना

ते: नाही हो, आता या वर्षी एकदा गेलो होतो, १० मिनिटे बसलो, विचारपूस केली, थोडं फार इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि मोजून ११व्या मिनिटाला निघालो, थांबून तरी काय करणार हो, परत खटके उडतील त्या पेक्षा न थांबलेलं बरं. 

मी: आई वडील दोघेही आहेत अजून? 

ते: हो, आता या वयात जे त्रास असायचे ते आहेतच, पण बाकी व्यवस्थित. 

मी: चांगलं आहे. 

ते: तुम्हाला खरं सांगू का? मला असं वाटतं की मी आयुष्यात कुठे कुठे फार चुकलोय, खूप झिडकारलंय मी लोकांना, अहो एक वेळ अशी होती की लोकं दारात लाईन लाऊन उभे होते माझ्याकडे कुंडली बघायला, मार्गदर्शन घ्यायला. पण ते ऐकायचे नाहीत मी उपाय सांगायचो ते, प्रसंगी दुसऱ्या ज्योतिषाकडे जायचे आणि उपाय नाही लागला की परत यायचे. मी खूप उर्मटपणे लोकांना झिडकारलंय त्या वेळी, त्यांना म्हटलंय आता कशाला येता, जा तिकडेच. तेव्हा मी शांत रहायला हवं होतं असं वाटतं हो, आज आयुष्य फार वेगळं असतं. पण वाईट वाटायचं की ते ऐकत नाहीयेत, त्याचंच नुकसान होतं त्यात. 

मी: खरंय, तुमचं काम मार्गदर्शन करणं आहे, त्या मार्गावर माणसाने चालायचं की नाही हा निर्णय त्याचा आहे, त्याच्या निर्णयाचं सोयरसुतक तुम्ही घेण्याचं काही काम नाही. ते तुम्ही आताही करू शकता की आणि, आज पासून ठरवा, आपण असं वागणार आहोत, नवीन आयुष्य सुरू होईल तुमचं या क्षणाला. 

ते: तुम्ही म्हणतात ते बरोबर आहे पण आता वेळ निघून गेलीय हो, आता काय उपयोग. 

मी: साहेब वेळ तिथेच असते, आपण हा प्रवास करतोय काही काळ. आणि तुमचा प्रॉब्लेम वेळ गेली हा नाहीये, तुमचा प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही स्वतःला माफ करू शकत नाही आहात. तुम्ही स्वतःला मिठी मारून माफ केलंत तर सगळं कोडं सुटेल तुमचं. 

इथे मात्र गुरुजींचा बांध जवळजवळ फुटला, तरी असलं नसलेलं सगळं बळ एकवटून ते अश्रू मागे लोटायचा प्रयत्न करत होते, पण त्यांची परवानगी न घेता २ थेंब निसटून ओघळलेच. ते टिपत ते म्हणाले,

ते: खूप अवघड आहे हो. 

मी: हो, उपाय सरळ आहे पण सोपा नाही. पण अशक्य नाहीये. आपण स्वतःचे सगळ्यात मोठे निंदक आहोत. तुम्ही सगळ्यात पहिले स्वतःला सांगा की तुम्ही सुद्धा शेवटी माणूस आहात. दुसऱ्यांना मार्ग दाखवण्याचा तुमचा धंदा असला तरी तुमच्यासाठी सुद्धा त्या मार्गावरून चालणं तेवढंच अवघड आहे, आणि ते ठीक आहे, त्या मुळे माणूस म्हणून तुमची किंमत कमी होत नाही. स्वतःच्या खांद्यावर हात ठेऊन म्हणा, चालतं एवढं, काही विषय नाहीये, बघून घेऊ जे होईल ते. कठीण आहे, पण हाच मार्ग आहे. गेल्यावर देवाने तुम्हाला माफ करायची वाट बघू नका, माफ करून टाका स्वतःला. 

आता मात्र गुरुजींचा बांध फुटत आला होता. त्यांनी डोळ्याला हात लावला, मी सुद्धा त्यांना अस्वस्थ वाटायला नको म्हणून बाहेर पाहिलं, दादर स्टेशन समोर दिसायला लागलं होतं. मी त्यांना म्हटलं, चला, आमचं स्टेशन आलं, उतरायला हवं. काळजी घ्या. ते म्हणाले, हो तुम्ही सुद्धा, आता काय तुमचा नंबर घेतलाय तर बोलणं होईलच. मी उतरलो, कामाला लागलो. मनात त्या ज्योतिषाचा विचार आल्यावर जरा खिन्नता सुद्धा वाटत होती आणि अजून एकदा माझ्या मित्राची मदत केल्याचा आनंद सुद्धा!

6 thoughts on “थकलेला ज्योतिषी आणि मानसशास्त्राचा विद्यार्थी”

  1. सहज, सोपे आणि भावपूर्ण लेखक म्हणजे साधुवाणी.. उत्तम 👏👏

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top