बस कंडक्टर काका

बस कंडक्टर काका

७–८ महिन्या पूर्वीची गोष्ट आहे, मी नेहमीप्रमाणे मुंबईतून रात्री निघत होतो, पण त्या वेळी मी आमच्या जोशीशेठ सोबत पनवेल ला राहत होतो तर कर्जत ऐवजी पनवेल च लोकेशन टाकलं. Ride accept झाली, मला वाटलं नेहमीप्रमाणे nearing scrap wagonR असेल पण नवीकोरी Swift Dzire आली हो, म्हटलं वाह! नेहमीप्रमाणे गप्पा मारता याव्यात म्हणून पुढे बसलो, एक काका-वयीन गृहस्थ होते, नमस्कार – चमत्कार करून प्रवास सुरू झाला. गाडी एकदम नवीन होती आणि मी एकदम गप्पिष्ट. मग मी तिथून च सुरुवात केली.

मी – काका गाडी एकदम टकाटक आहे की तुमची. नवीनच असेल ना? तुमची आहे की भाड्याने घेऊन चालवता?

काका – आपली स्वतःचीच आहे गाडी. ४ महिनेच झालेत या गाडीला. एक मोठी गाडी पण आहे, मोठा group असेल तर बरं पडतं.

मी – वाह. क्या बात है! मग आता तुमचा दिवस संपत आलाय की सुरू होतोय?

काका – तुम्हाला सोडून घरी जाणार मस्त. माझं घर पुढे १० मिनिटांवर च आहे. मी बेस्ट मधे कंडक्टर आहे. सकाळी येताना आणि रात्री जाताना, कोणी मिळालं तर भाडं घेतो. बाकी वेळ नाही मिळत.

मी – अरे वाह! भारी काम आहे तुमचं. किती वर्ष आहात बेस्ट मधे?

काका – झाली असतील २०-२५ वर्ष.

मी – एक नंबर. काय हो काका, मधे खूप बिकट परिस्थिती होती ना? नीट पगार नाही काही नाही. तेव्हा ते संप वगैरे झाले होते. तुम्ही होतात का त्यात?

काका – होतो की. म्हणजे मी काही पुढारी नव्हतो पण युनियन च ऐकायला लागतं ना.

मी – बरोबर आहे. तुम्ही पहिल्या पासून कंडक्टर म्हणूनच आहात का?

काका – मी driver म्हणून लागलो होतो. नंतर कंडक्टर झालो.

मी – काय हो काका, मी ऐकलंय बस ड्रायव्हर लोकांना ७ खून माफ असतात, खरंय का? xD

काका – माफ नसतात, चूक कोणाची आहे त्यावर असतं. Accident झाल्यावर तो माणूस १२ तासात गेला तर enquiry वगैरे लागते. सस्पेंड होतो. असं सगळं असतं.

तेव्हा काकांनी मला आख्खी procedure सांगितली जी काही मला आठवत नाही, पण थोडक्यात आपण मस्ती करून बस वाल्याच्या रस्त्यात जाऊ नये हे आठवतंय.

ती procedure सांगून झाल्यावर काका म्हणाले –

काका – माझ्यासमोर आला होता ना एक बाईक वाला. त्याचीच चूक होती. सिग्नल तोडून चाललेला आणि लक्ष नव्हतं नीट, on the spot च गेला. माझी काही चुक नव्हती पण त्या नंतर मी कंडक्टर म्हणून पोस्ट मागून घेतली. Driver ला पगार जास्त असतो पण २ पैसे कमी मिळाले तरी चालतील, शांत झोप लागली पाहिजे.

मी – खरंय काका. शांत झोप लागणं खूप महत्वाचं आहे.

२ मिनिट शांततेत गेली, मी मुद्दामच विषय वाढवला नाही, म्हटलं काकांना आठवणीत नको टाकायला. पण काकांनीच बोलायला सुरुवात केली.

काका – आयुष्य आहे. होत राहतं. तुम्हाला एक विचारू का?

काका काय विचारणार याची मला पूर्ण कल्पना होती. मी म्हटलं विचारा की काका बिनधास्त.

काका – तुमचं हाताचं काय झालं? पहिल्या पासूनच आहे की काही झालंय?

मी – नाही पहिल्या पासून नाही, ४ वर्षापूर्वी accident झाला होता.

मग मी काकांना माझी गोष्ट सांगितली. काका गाडी चालवत चालवत मन लाऊन ऐकत होते. ऐकून झाल्यावर नेहमीसारखे काही कौतुकाचे कीवर्ड्स काकांनी सुद्धा बोलून घेतले आणि आमची गाडी परत गप्पांच्या हायवे ला लागली.

मी – तुमचं गाव कुठलं काका? की इथलेच आहात तुम्ही?

काका – मी साताऱ्याचा. १६ वर्षाचा होतो तेव्हा मुंबईत आलो.

मी – १६ म्हणजे लहान होतात की. एवढ्या लवकर कसं काय मुंबई गाठली?

काका – मी अभ्यासात एक नंबर ढ बघा! काही जमत नव्हतं आणि मेन म्हणजे interest च नव्हता, मग एकदा असं वाटलं की कुठे आई बापाला त्रास द्यायचा अजून. मग मुंबई ची गाडी पकडली आणि आलो.

मी – डेअरिंग बाज आहात की तुम्ही काका. खतरनाक विषय आहे तुमचा.

काका – ते आता बोलायला काही वाटत नाही. तेव्हाचे दिवस आठवले तरी नको वाटतात. मीरारोड च्या आसपास एका मित्राची खोली होती तिथे गेलो. पण एकदम घाणेरडी वस्ती, धड पाणी नाही काही नाही. तुम्हाला सांगतो सकाळी एका वेळेला कुठून तरी सांडपाणी यायचं त्यात आम्ही अंघोळ केलीये. आठवलं तरी रडायला येतं. त्या मित्रानेच ड्रायव्हिंग शिकवलं, पहिले प्रायव्हेट मध्ये काम केलं, नंतर या बेस्ट च्या परीक्षांचं कळलं तिथे जाऊन परीक्षा दिली. पहिल्यांदा fail झालो. परत १-२ वर्षांनी दिली तेव्हा पास झालो आणि ड्रायव्हर म्हणून लागलो.

मी – खतरनाक story आहे ओ काका तुमची! पाणीच आलं डोळ्यातून.

काका – त्या मित्राने ड्रायव्हिंग शिकवलं ठीके, पण त्याने बियर चा पण नाद लावला ओ. काहीच व्यसन नव्हतं मला, ते एक लागलं. तुम्हाला सांगतो १६-२१ मधे तुमची संगत खूप महत्वाची असते. तेव्हा चुकीची संगत लागली तर आयुष्य वाया जातं बघा. म्हणून मी माझ्या मुलाला मित्रच नाही होऊ दिले. आता शिक्षण संपून नोकरीला लागेल तो. त्याचं त्याचं नीट बघेल.

मी – संगतीचं एकदम खरं बोललात तुम्ही काका. पण त्या साठी मित्रच न होऊ देणं? एकटा पडला असेल की तो.

काका – खरंय तुमचं. पण तो ही लहानपणापासून फार माणसात राहणारा नव्हता. आणि मी फोर्स केला असला तरी आज त्याला कुठलं व्यसन तर नाहीये. आणि आता ऑफिस मध्ये बनवेल की मित्र. आता कसेही माणसं भेटले तरी त्याला व्यसन नाही ना लागणार. त्यामुळे मला त्याच काहीही वाईट वाटत नाही.

मी – तुम्ही म्हणता ते चुकीचं ही नाहीये म्हणा. असो. पण एवढ्या वाईट परिस्थितीतून वाट काढत तुम्ही इथपर्यंत पोचलात. कधी कळी सांडपाण्यात अंघोळ करायला लागलीय तुम्हाला, ते आज तुमचं टॉवर मध्ये घर आहे, नवीन गाडी आहे, चांगला संसार आहे. मुलगा मार्गाला लागतोय. कसं वाटतंय तुम्हाला?

काका म्हणाले छान वाटतं की, १ मिनिट शांत बसले, आणि अचानक रडायला लागले. रडत रडत च म्हणाले.

काका – खरंच, खूप वंगाळ गेलंय आयुष्य त्या वेळी. काय काय दाखवलंय त्या देवाने, माझं मलाच ठाऊक. कधी कोणाजवळ बोललो पण नाही. अगदी जवळच्या एका दोघांना थोडं फार सांगितलं असेल पण आजवर एवढं कोणाशीच बोललो नाही. भरून आलं एकदम.

मी – काही हरकत नाही काका. आता सगळं छान आहे की! जिंकलात तुम्ही. आता tension नका घेऊ.

या सगळ्या गप्पांमध्ये पनवेल कधी आलं कळलंच नाही. काकांना thank you म्हणालो, पैसे दिले आणि घरी गेलो. जाता जाता एक विचार आला मनात, फक्त मोठ्या लोकांच्या नाही पण प्रत्येकाची आपापली गोष्ट असते, आणि ती तेवढीच खास असते, फरक इतकाच की प्रत्येकाला आपली गोष्ट सांगायचा चान्स मिळतोच असं नाही, अगदी आपल्या जवळच्यांना सुद्धा! आणि अशा काही गोष्टींचा कान व्हायची संधी मला मिळते याबद्दल कृतकृत्य वाटलं!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top