डूचकी बंगालन आणि एप्रिल फूल

Cartoon of women arguing inside a Mumbai local train with a TC observing — featured in Sadhuwani's humorous blog

एप्रिल महिन्याची पहिली सकाळ, आणि आज निसर्ग एप्रिल फूल बनवतोय की काय असं वाटावं असं वातावरण… थंड! लांब लांब पर्यंत कुठेही ऊन दिसत नव्हतं, मस्त मळभ आलं होतं. चक्क उन्हाळ्यात सूर्याला झाकण्याची कोणीतरी हिंमत केली होती. याच अचंब्यात आणि आनंदात मी ९.४५ ची लोकल पकडली, फर्स्ट क्लास मध्ये जाऊन बसलो, त्या दिवशीचा ब्रोच्या कुठे दिसतोय का बघत होतो. 😂

लोकल निघाली, आज सगळं शांत होतं. नेहमीप्रमाणे स्टेशन्स आले, गेले. बदलापूर आलं, गाडी भरली. पण आज माझं कुठेच लक्ष नव्हतं, मी आज लिखाणात पूर्ण मग्न होतो, मनाली ट्रिप मध्ये घडलेल्या सगळ्यात सुंदर गोष्टीवर लिहित होतो मी, एकदम मनापासून! तंद्री लागली होती मस्त, ही तंद्री तुटली ती कोणीतरी खांद्यावर हात लाऊन मला बोलावलं म्हणून, बघतो तर TC मॅडम, कल्याणला या मॅडम गाडीत चढल्या होत्या, सगळ्यांचं तिकीट बघत शेवट पर्यंत पोचल्या, तो पर्यंत डोंबिवली येत होतं, मी बॅगेतून काढून पास दाखवला, बॅग परत वर ठेवली आणि परत लिखाणात गुंग झालो. 

लोकलने जसं दिवा सोडलं तसं समोरच्या लेडीज फर्स्ट क्लास मधून मोठ्या मोठ्याने आवाज यायला लागले. आता लोकल मध्ये होणारी बायकांची भांडणं हा मुंबईकर चाकरमान्याचं सगळ्यात मोठं करमणुकीचं साधन आहे, म्हणून सगळ्यांनी आपले डोळे आणि कान समोर वळवले आणि आपल्यावर बालंट येऊ नये म्हणून डोळे मधूनच इकडे तिकडे फिरवत होते, पण आख्या डब्याचे कान मात्र तिथेच होते. मी सुरुवातीला दुर्लक्ष केलं कारण मी माझ्या ब्लॉगच्या शेवटा पर्यंत पोचलो होतो, आणि पाचकळ भांडणासाठी मला दुर्लक्ष करावसं वाटलं नाही. 

२ मिनिटात माझा ब्लॉग लिहून पूर्ण झाला आणि मी सुद्धा माझ्या बाकीच्या बांधवांना साथ देत डोळे आणि कान योग्य जागी फिरवले. तो पर्यंत समोरच्या हिरवळीमध्ये चांगलाच वणवा पेटला होता. 😂 पुढच्या दीड मिनिटात आग नक्की कशा मुळे लागली ते ही आम्हाला ऐकू आलं कारण किंचाळण्यात आता सुसूत्रता आली होती. 

ज्या TC मॅडम आमच्या डब्यात आल्या होत्या, त्याच डोंबिवलीत उतरून त्या डब्यात तिकीट तपासायला गेल्या होत्या. एका बसलेल्या बाई कडे तिकीट नव्हतं, तिला दंड भरावा लागणार होता, पण दंगा तेव्हा झाला जेव्हा उभ्या असलेल्या बायकांनी तिचा पाणउतारा करायला चालू केला, गदारोळातून जे ऐकायला आलं ते इथे लिहितोय — डूचकी मेली, आम्ही इथे २ हजाराचा पास काढून उभ्या आणि ही फुकटी बसलिये बघ कशी. २–४ बायका तत्सम या अर्थाचं बोलल्यावर ती तावातावाने उठली आणि भांडणाला सुरुवात झाली होती. 

आता ही बाई विरुद्ध लेडीज फर्स्ट क्लास असा सामना सुरू होता, आणि त्या मध्ये TC मॅडम दंड वसूल करायचा चंग बांधून उभ्या होत्या, नंतर समजलं की 2 TC मॅडम होत्या, आणि दोघींनी तिला घेतली होती, म्हणजे दंड तर घेतला जाणारच होता, मार्च एंडिंग झाल्यावर दुसऱ्या दिवशी हे टार्गेट मिळालं होतं ना. 😂

नंतर असं समजलं की या बाई सोबत अजून एक बाई होती जी मुळात हिला फर्स्ट क्लास मध्ये घेऊन आली होती. आणि ती एकदमच शांत होती, काहीच बोलत नव्हती, पण हिचा भोंगा चालूच होता, ती TC मॅडमना म्हणाली तुमची कम्प्लेंट करते उतरून, त्यामुळे जिथे TC मॅडम दोघीत एक पावती फाडत होत्या, तिथे हिच्या बोलण्याला वैतागून त्यांनी २ फाडल्या आणि ताईंना सकाळी सकाळी ८८० ची फोडणी बसली. असंही कळलं की ते तिच्याकडे असलेले शेवटचे पैसे होते आणि त्यातसुद्धा तिच्याकडे १० रुपये कमी होते, पण तिने पहिले केल्या प्रकारामुळे TC मॅडम १० पण कमी करत नव्हत्या, कोणीतरी १० रुपये दिले तिला आणि एकदाची पावती फाटली, 

ती सबंध वेळ आक्रोश करत होती, रागारागत बाकीच्या बायकांना म्हणत होती, पैसे दे रही हू ना, तो शांत बैठो, ज्यादा बकबक मत करो, गलती इंसान से होती है. तिचं हे वाक्य ऐकून तिने नक्की चूक केलीये की रेल्वे वर उपकार, तेच कळत नव्हतं. 😂 नंतर नंतर तर ती बंगालीत ओरडायला लागली, तेव्हा एक मराठी काकू, ज्या मगाशी तिला डूचकी म्हणाल्या होत्या, बघा बघा डूचकी बंगालन बघा, उतरून काला जादू करणार आता आपल्यावर, ते ऐकून समस्त पुरुष वर्गाला हसू अनावर झालं आणि आता पर्यंत शांतपणे ऐकणारे आम्ही हसत हसत टाळ्या द्यायला लागलो. भूल भुलैया ४ साठी ही स्क्रिप्ट खपून जाईल असंही एकदा मला वाटून गेलं. 😂 
भोली भाली थी, सिधी साधी थी ,मैं तो नादान थी.. दुनियादारी से, होशियारी से मैं तो अंजान थी. 😂😂

शेवटी घाटकोपरला त्या दोन मैत्रिणी, दोन्ही TC मॅडम उतरल्या. एवढ्या सगळ्या प्रसंगात तिची मैत्रीण मात्र शांतच होती, चिडीचुप्प एकदम. मळभाच्या या सकाळी आपल्या डूचक्या बंगालन मैत्रिणीचा तिने व्यवस्थित एप्रिल फूल केला होता हे मात्र खरं, आणि करता करता जवळ जवळ १०० लोकांचं मनोरंजन केलं होतं. 😂

2 thoughts on “डूचकी बंगालन आणि एप्रिल फूल”

  1. 🤣🤣🤣🤣🤣 तुझी आज ची सकाळ खूप गंमतशीर झाली च पण हा ब्लॉग वाचून आमची पण सकाळ मस्त गेली 🤣🤣👏🏻👏🏻👏🏻 खूप छान

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top