गाडी सुटली...
आज खरंतर मला आता पर्यंत सगळ्यात जास्त भावलेल्या एका संभाषणाबद्दल लिहिणार होतो. कामं आटपून घरी आलो, आता लिहूया असं म्हणता म्हणता काहीतरी नजरेसमोर आलं आणि माझं मन दुसऱ्या एका आठवणीत रमलं, रमलं म्हणजे हरवलंच एकदम, आणि संदीप खरेंची ही ओळ आठवली..
गाडी सुटली, रुमाल हलले, क्षणात डोळे टचकन् ओले…
कधी कधी ही गाडी आपली नव्हेच याच भ्रमात आपण असतो पण गाडी सुटल्यावर अचानक जाणवतं की ही तर आपल्याच गावची गाडी होती.. कधी कधी तर आपण धावत धावत फलाटावर पोचतो आणि गाडी सुटते.. कितीही धावा, तरी गाडी चुकायची ती चुकतेच.
हा विचार करता करता ते गाणं लावलं, बराच वेळ ऐकत होतो, आणि अचानक मनात विचार आला, की त्या गाडीला काय वाटत असेल बुआ?
’कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी’ करता करता मधेच त्या गाडीला असं वाटत असेल का, की आपण त्या प्रवाशाला न घेताच गेलोय. तिला वाटत असेल का, की परत फिरावं, त्या प्रवाशाला घ्यावं… आणि कितीही वाटलं, तरी एकाच दिशेने पुढे जाणारे ते काळरुपी रूळ गाडीला त्याच मार्गावरून त्या एका प्रवाशासाठी परत जायची परवानगी देत असतील का? आणि त्यामुळे कितीही इच्छा असली तरी निष्काम कर्मयोग्यासारखं तिला पुढेच धावावं लागत असेल का?
काहीही असो, ना गाडीला धावणं चुकलंय, ना रुळांना दिशा, ना प्रवाशाला प्रवास.. आपल्या प्राक्तनाचे आपण सगळेच निष्काम कर्मयोगी!

