जैसे ज्याचे कर्म

बुधवार दुपारची वेळ, एका कामासाठी दादरला जात होतो. लोकल तशी रिकामीच, त्यात सुद्धा एका भल्या माणसाने मला विंडो दिली कारण तो लवकर उतरणार होता. प्रवास चालू झाला, खूप वर्षांनी आज एक गाणं डोक्यात फिरत होतं, अशोक पत्की यांचं, “भातुकलीच्या खेळामधली“. ऐकायला सुरुवात केली, त्यातला एक अंतरा नेहमी डोळ्यातून पाणी आणतो,
तिला विचारी राजा, “का हे जीव असे जोडावे?
का दैवाने फुलण्याआधी फूल असे तोडावे?”
या प्रश्नाला उत्तर नव्हते, राणी केविलवाणी
अर्ध्यावरती डाव मोडला अधुरी एक कहाणी!
त्याच ढंगाची गाणी पुढे लागत गेली, कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर, देहाची तिजोरी, शतदा प्रेम करावे.
मुंबईची लोकल तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागी पोचवते, पण या गाण्यांच्या लोकलने मला थेट माझ्या बालपणात नेऊन सोडलं, बाबा सकाळी ऑफिसला जाताना टेपरेकॉर्डर वर ऐकायचे ही गाणी.
बाहेर पावसाच्या आधीचं थंड वातावरण, कानात ही गाणी, आणि मनात बालपणीच्या आठवणी; सकाळ कशीही झाली असली तरी दुपारच्या वेळेने ती कसर भरून काढली होती. मजा येत होती.
आणि पुढचं गाणं लागलं. जैसे ज्याचे कर्म! एकतर हे वातावरण, त्या गाण्याचे आर्त बोल आणि त्यात प्रल्हाद शिंदेंचा भावनावश करणारा आवाज. संपला विषय!
त्या गाण्याच्या या ओळी कानावर पडल्या.
देह करी जे जे काही
आत्मा भोगितो नंतर,
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्वर..!
डोक्यात विचारचक्र सुरू झालं आणि मी गाणं थांबवून लिहायला सुरुवात केली.
मी नेहमी म्हणतो आपले ऋषी मुनी हे थोर विचारवंत होते ज्यांनी मनुष्याला सभ्यतेची चौकट आखून दिली, प्राण्यापासून माणूस व्हायच्या या प्रवासात त्या चौकटीचे खूप मोलाचे योगदान आहे. त्या चौकटीनेच आपल्याला कसे जगावे, काय करावे, काय करू नये या बद्दल शिकवले. पण त्याचं कोणी का ऐकेल? आपण कुठलीही वेगळी गोष्ट फक्त तीन कारणांमुळे करतो! आदर, भीती आणि फायदा! आणि त्यातूनच जन्म झाला देवाचा!
या तिन्ही गोष्टी देव तुम्हाला बरोबर देतो. तुम्हाला कोणीतरी बनवलंय त्याचा आदर, तुम्ही चुकीचं वागलात तर तुम्हाला नरकात जावं लागेल याची भीती आणि बरोबर वागलात तर स्वर्गात जाण्याच्या फायद्याचं आमिष.
माझे हे विचार आणि त्या ओळी, याचा हुबेहूब मेळ बसला आणि मी स्वतःशीच हसलो. वेळोवेळी जगातल्या सगळ्यात हुशार, विद्वान आणि प्रतिभावान माणसांनी आपल्याला दिलेली भेट, सद्सद्विवेक बुद्धी!