क्षणभंगुर जीवन

सोमवार, सकाळी १०.२४ ची वेळ. मी स्टेशनसाठी रिक्षा पकडली, काकांना विचारलं, १०.४१ मिळेल का? काका म्हणाले, मिळायला तर पाहिजे, टक्क्या वरून घेऊ, ट्रॅफिक कमी लागेल.
काका: थोडं लवकर निघालात ना, तर बरं पडेल तुम्हाला, टेन्शन नाही राहणार.
मी: अहो काका मी रोज १०.१५ लाच निघतो, आज जरा जिम मधे उशीर झाला. त्या मुळे नाश्त्याला उशीर झाला. आणि व्यवस्थित नाश्ता केल्याशिवाय कशाला बाहेर पडायचं, एक गाडी नंतरची मिळाली तरी चालेल की.
काका: एकदम बरोबर, शरीराची हेळसांड करून काहीही करायची काहीच गरज नसते. शरीर आहे म्हणून आपण आहोत. त्याला वेळ द्यायलाच पाहिजे.
मी: हो मग, प्रश्नच नाही.
काका: पैसा पैसा करून काही होत नाही हो, शेवटी आपण गेल्यावर तो बरोबर थोडीच येणारे. सगळ्याचा वाटप होणार, जे काहीच तुमचं नसतं, त्यासाठी किती धावपळ करतो आपण, आणि जे खरंच फक्त तुमचं आहे, त्याची वाट लावतो.
मी: खरंय काका, फक्त शरीरच काय ते आपल्या सोबत जळतं शेवटी, बाकी सगळं इथेच राहतं.
काका: खरंय, म्हणून त्याची काळजी घेतलीच पाहिजे. खूप क्षणभंगुर आहे आपलं आयुष्य, याची जाणीव रोज असलीच पाहिजे आपल्याला.
मी: खरंय काका.
काका: आणि पैशावर काही नसतं हो, एखादा माणूस तुमच्या सोबत बसला की त्याला कसं वाटतंय तुमच्या सोबत, तो तुम्हाला कसा लक्षात ठेवतोय, त्यावर सगळा गेम आहे.
तेवढ्यात आम्ही एक नदीचा छोटासा पूल ओलांडला ज्यावर खूप कचरा लागला होता.
मी: एवढा कचरा कसा आला असेल हो इकडे काका?
काका: पाऊस जास्त होता त्या मुळे नदीचं पाणी पुलावरून गेलं ना, त्याचा कचरा अडकलाय इथे. किती घाण करून ठेवलंय जग आपण. अहो तुम्हाला सांगतो, आम्ही लहानपणी अंघोळ करायचो या नदीवर रोज शाळेत जाताना, एवढी स्वच्छ होती ही नदी.
मी: काय म्हणता!?
काका: हो मग, डोळे लाल व्हायचे आमचे त्याने, मग मास्तरला लगेच कळायचं, रोज आम्हाला फटके द्यायचा, पण आम्ही तरीही रोज जायचो, मजा यायची.
मी: वाह. एक नंबर.
काका: तो समोर डोंगर दिसतोय ना, काही काही लोकं येतात आता चालायला तर १० मिनिटात धापा टाकतात. मी त्याच्या रोज २–३ फेऱ्या मारायचो, न थकता. तिथून काकड्या घेऊन यायचो ४०–५० किलो.
मी: वाह.
मग काकांनी त्यांच्या आयुष्याबद्दल सांगितलं, मुलं कुठे शिकतात काय करतात ते सांगितलं. त्यात ते असं काहीतरी बोलून गेले जे आपल्याला सगळ्यांना वाटतं, पण आपण ते उच्चारताना खूपच विचार करतो, उगाच.
काका: तुम्हाला सांगू का, आता पोरं बाळं आहेत, ते मोठे होई पर्यंत आपल्याला काहीतरी करायला पाहिजे म्हणून करतोय, नाहीतर मला या आयुष्यात काहीच इंटरेस्ट नाहीये.
मी: समजा तुमच्या डोक्यावरून सगळ्या जबाबदाऱ्या काढून घेतल्या आणि तुम्हाला सांगितलं हवं ते करा, तर काय कराल?
काका: शांतपणे शेती करीन, थोड्या दिवसांनी एखादी विहीर वगैरे काढेन, भाज्या वगैरे लावेन, निवांत जगेन.
मी: तुमची इच्छा नक्की पूर्ण होवो!
तेवढ्यात स्टेशन आलं, घड्याळात पाहिलं, १०.३९, २ मिनिटात गाडी पकडली, आणि आधीच सार्थकी लागलेला दिवस सुरू झाला!