निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही!

निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही! - sadhuwani

आजारी काका आणि रात्रीचा प्रवास

मागच्या रविवारची गोष्ट, संध्याकाळची वेळ होती, एका मैत्रिणीचे २ मिस्ड कॉल्स दिसले, जवळ जवळ २ वर्षांनी फोन आलेला दिसला त्यामुळे मनात पाल चुकचुकली की काहीतरी मेडिकल इमर्जन्सी असावी, आणि तेच निघालं. तिचा कर्जतच्या काकाला मलेरिया झाला होता आणि प्लेटलेट्स बऱ्याच कमी होत्या, सुदैवाने मी कर्जतमध्ये होतो तर त्यांना दवाखान्यात घेऊन गेलो. तिथे ऍडमिट करायचं सांगितल्यावर असं ठरलं की कल्याणला त्यांच्या नातेवाईकांकडे जायचं आणि ओळखीच्या डॉक्टरांकडे ऍडमिट व्हायचं.

ते दुसऱ्या दिवशी सकाळी जायचं म्हणत होते पण मेडिकल इमर्जन्सीच्या वेळी कोणी मला जबाबदार म्हणून उभं केलं की मी सहसा कोणाचं ऐकत नाही, पेशंटचं तर मुळीच नाही. डॉक्टरांच्या तर्कशास्त्रानुसार आणि माझ्या निर्णयक्षमतेनुसार मला जे योग्य वाटतं ते करून मी मोकळा होतो, त्या मागे विचार असा की, उद्या काही चुकीचं झालं, तरी तो माझा निर्णय होता त्या मुळे मी त्याची जबाबदारी स्वीकारून जे असेल त्याला सामोरा जाऊ शकतो. म्हणून मग मी तेव्हाच त्यांना कल्याणला पोचवायचा निर्णय घेतला, ॲम्ब्युलन्स बोलावली, ती २० मिनिटात आली. आणि ‘पेशंट काका, त्यांची बायको, ॲम्ब्युलन्सवाला दादा आणि मी’ असा रात्री ११ वाजता प्रवास सुरू झाला.

ॲम्ब्युलन्स मध्ये झालेल्या डिलिव्हरीज

आमच्या गप्पा सुरू झाल्या. काकांना तेव्हा ताप वगैरे नव्हता, त्यामुळे तेही झोपले नव्हते, बोलत वगैरे होते, तेवढ्यात आम्हाला एक मोठा खड्डा लागला आणि साहजिकच परिसंवादाचा नवीन विषय हा कर्जत – कल्याणचा रस्ता यावर गेला.

मी: खड्डा आहे की मस्करी!

दादा: काही विचारू नकोस बाबा, आम्हाला रोजचंच झालंय.

मी: काका तुम्ही ठीक आहात का?

काका: हो. व्यवस्थित.

तेवढ्यात एक स्पीडब्रेकर लागला.

दादा: खड्डे आणि स्पीडब्रेकर, यातच पेशंटचा अर्धा गेम होतोय. कर्जत कल्याण रस्त्यावर १२१ स्पीडब्रेकर आहेत.

मी: डेंजर काम आहे. एखादा रस्ता एवढा ओळखीचा असावा की स्पीडब्रेकर किती ते ही माहिती असावं, वाह!

दादा: पण खड्डे मोजायचा जोर माझ्यात पण नाहीये. 😂

मी: वाह 😂. पण सिरीयस पेशंटची वाट लागत असेल ना रे?

दादा: रस्त्याच्या कृपेने आतापर्यंत या ॲम्ब्युलन्स मधे १४ डिलिव्हरिज झाल्यात!

मी: काय? 😂😂

दादा: हो. आता तरी बरं आहे जरा. आधीच्या काळी तर काही लोकं मुद्दाम यायचे. डॉक्टरचा खर्च परवडायचा नाही, म्हणून मुद्दाम लांबच्या दवाखान्यात घेऊन जायचं, वाटेतच काम झालं की अर्ध्या रस्त्यातून परत घरी. वाचला ना खर्च.

मी: डेंजर! 😂😂

AI च्या आधी डॉक्टरांचा जॉब रस्त्याने खाल्ला या कल्पनेने मला जास्त हसायला आलं.

परतीचा प्रवास

अशाच गप्पा मारत मारत आम्ही १ वाजता कल्याणला पोचलो, काकांना त्यांच्या नातेवाईकांकडे सोडलं आणि परतीच्या प्रवासाला लागलो. आता आम्ही दोघंच होतो, मस्त गाणी वगैरे लावली, old bollywood, येह शाम मस्तानी पासून मैफिल सुरू झाली. २–४ गाणी झाल्यावर मी त्याला ठेवणीतला प्रश्न विचारला.

मी: आजची कितवी फेरी ही तुझी?

दादा: चौथी.

मी: किती वर्ष चालवतोय तू ॲम्ब्युलन्स?

दादा: २० वर्ष झाली.

मी: कधी कधी जात पण असतील ना लोकं, तेव्हा काय वाटतं?

दादा: नजर मेलीये रे आता. काही वाटत नाही.

मी: का आलास या कामात? आणि २० वर्ष हेच का करतोय?

दादा: २० वर्षा पूर्वी माझ्या बहिणीची सातव्या महिन्यात डिलिव्हरी झाली, बाळाचं वजन खूप कमी होतं, त्याला त्या पेटीत ठेवावं लागणार होतं, पण कर्जतमध्ये काही होण्यासारखं नव्हतं, एकाची ॲम्ब्युलन्स घेऊन आख्या मुंबईत फिरलो, पण कोणीच नाही ऍडमिट करून घेतलं त्या बाळाला, शेवटी गेलं ते. तेव्हा ठरवलं, आपल्या सोबत जे झालं ते ठीके, पण दुसऱ्यांसोबत नको व्हायला, आपल्याच्याने जेवढी होईल तेवढी सेवा करायची. तेव्हापासून चालवतोय ॲम्ब्युलन्स.

मी: वाह. ईश्वर असेलच, तर त्याच्या खूप जवळची सेवा आहे ही, जी तू करतोयस!

दादा: गोर–गरिबांकडून, आदिवासी लोकांकडून पैसे पण नाही घेत आपलं मंडळ. आता तू जे पैसे देशील, त्याच पैशाने कमीत कमी ३ गरिबांची सेवा होईल आपल्याकडून.

मी: अशी सेवा माझ्याकडून नेहमी होत राहो हीच इच्छा! ✨

निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही

कमी केलेला गाण्यांचा आवाज मी पुन्हा वाढवला, काही वेळ गेला, आता दादा गाडी जरा जोरात घेत होता, कारण मागे पेशंट नव्हता कोणी. थोड्या वेळाने मी त्याला विचारलं,

मी: या २० वर्षाचा अनुभव तुला कोणी विचारला तर काय सांगशील दादा?

दादा: निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही. मी शवपेटी असलेली गाडी पण चालवतो. लक्षात ठेव, जेवढी जिवंतपणे हालचाल करायचा प्रयत्न करतो आपण, तेवढेच निपचित पडून असतो इथे गेल्यावर. आपल्या हातात काही नाही.

मी त्यावर काहीच उत्तर दिलं नाही, कारण त्याला उत्तर काय, दुजोरा द्यायची पण माझी पात्रता आहे असं मला वाटलं नाही. कान देऊन ऐकलं फक्त! मनात २ ओळी फिरत होत्या,

कल जो तनके चलते थे अपनी शानों शौकत पर,
शमा तक नही जलती आज उनकी तुरबत पर!

खूप पाऊस पडत होता, आम्ही शेलू – नेरळ च्या मधे होतो, दोन्ही बाजूला झाडं, एवढी की वारा तिथल्या तिथे फिरत राहील, बाहेर जाणारच नाही. आणि अचानक खूप वारा वाहू लागला. चालती ॲम्ब्युलन्स हलायला लागली एवढा वारा, दादा अचानक अस्वस्थ झाला, त्याने लगेच गाडी थांबवली कडेला, आणि शांत बसला, अर्धा मिनिट वारा तसाच वाहत होता, हळू हळू शांत झाला. त्याने गाडी परत चालू केली आणि आम्ही निघालो.

मी: हे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा घडलंय!

दादा: बाकी ठिकाणी झालंय आधी, पण या रस्त्यावर माझ्यासोबत पण पहिल्यांदाच. अशा वेळी नतमस्तक होऊन शांत बसावं, त्यातच शहाणपणा.

मी: तू म्हणालास तसं! निसर्गापेक्षा कोणी मोठं नाही. आणि त्याच्या पुढे कोणाचंच काही चालत नाही.

दादा: पटलं ना!

मी: हो!

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top