वेळ

वेळ - time - sadhuwani

आज जवळ जवळ एका महिन्यानंतर लिहायला बसलोय, ठरवून, तसा तर खूप आळस आलेला, पण सकाळी सकाळी एका मैत्रिणीने चित्र काढतानाचा व्हिडिओ टाकलेला पाहून लिहायची इच्छा झाली. मग आवरून बसलो लिहायला, पण बसायच्या आधी कशावर लिहूया यावर चांगलं विचारमंथन झालं, मग ते शांत करायला आख्खं घर आवरून झालं, मग ठरवलं विचार करायला एवढा वेळ घालवलाय तर ‘वेळे’वरच लिहूया!

वेळ ही फार विरोधाभासी आहे, कधी कधी दिवसभरात आपण श्वास घेतला का हे बघायला सुद्धा वेळ नसतो आणि कधी कधी वाटतं की केवढा वेळ आहे आपल्याकडे. तसं तर आपण जन्माला येताना फक्त वेळच तर घेऊन येतो. मी यावर पूर्वी सुद्धा एकदा लिहिलं होतं की वेळ हे एकच खरं चलन आहे जगातलं, जे फार जपून खर्च करायला हवं कारण वेळ फक्त गमावता येते, कमावता येत नाही. माझं नेहमी एकच म्हणणं असतं, की माझ्या वेळेचं काय करायचं हे मी ठरवलं पाहिजे, माझी वेळ कोणाकडे गहाण नसली पाहिजे.

हे लिहिता लिहिता जाणवलं की वेळ किती मजेशीर आहे, वेळ पुल्लिंगी सुद्धा आहे आणि स्त्रीलिंगी सुद्धा, पण दोन्हीकडे महत्व मात्र बदलतं, नाही का, कारण वेळ हा प्रत्येकाकडे सारखाच असतो पण वेळ कोणाचीच सारखी नसते! म्हणून मला मराठीत लिहायला जास्त आवडतं, मराठी भाषा कशी, वळवावी तशी वळते, पळवावी तशी पळते. असो, वेळेत वेळेवर परत येऊन फार वेळ न घालवता वेळेवर बोलूया!

आपला वेळ कसा खर्च करावा याची प्रत्येकाची आपापली समीकरणं असतात, प्रत्येक माणसाची स्वतःच्या मनात स्वतःबद्दल एक गोष्ट असते, त्या नुसार तो आयुष्यात त्याची स्वप्न आणि मर्यादा या दोन्ही गोष्टी ठरवत असतो, स्वतःभोवती एक अदृश्य लक्ष्मणरेषा आखतो, की मी असा आहे, मला आयुष्यात हे एवढं मिळू शकतं आणि त्यासाठी मी हे करणार. आणि मग या गोष्टीच्या आधारावर तो आपला वेळ कुठे खर्च करायचा याचा निर्णय घेत असतो.

माझी नेमकी इथेच गोची होत आलेली आहे. मला स्वतःच्या मर्यादा ठरवतानाच खूप अडचण येते, कळतच नाही की लक्ष्मणरेषा आखावी कुठे, स्वप्न बघावी तरी काय आणि आपला वेळ घालवावा तरी कशावर. कधी कधी वाटतं आपल्या कुवतीला मर्यादाच नाहीयेत आणि कधी कधी वाटतं आपल्या आयुष्याला कोणी जीवन म्हणावं एवढी आपली कुवतच नाहीये.

मागच्या आठवड्यात याच गोष्टीवर नेहमीची डोकेफोडी करताना एक विचार आला की एवढा विचार करायचा कशाला? आपल्याला जर मर्यादा ओळखून लक्ष्मणरेषा आखताना अडचण येत असेल तर आपण असं समजून चालू की आपल्या मर्यादांना अंतच नाहीये आणि लक्ष्मणरेषा आखण्याची गरजच नाहीये. बघू काय होतंय, एकतर खरंच काहीतरी अविश्वसनीय होईल किंवा कुठेतरी तोंडावर आपटेन, अविश्वसनीय झालं तर मजाच आहे आणि समजा तोंडावर आपटलो जरी, तरी एकदाची स्वतःची मर्यादा तर कळेल. दोन्ही बाजूंनी विजय आपलाच आहे.

मग त्या दिवशी ठरवलं की असं समजून चालायचं की लक्ष्मणरेषा नाहीचे, मग लगेच पुढची अडचण समोर आली, रोज नेटाने एकच गोष्ट करणं. मी लहानपणापासून फार चंचल आहे, एका जागी स्वस्थ बसणं म्हणून नाही. पण जर मला माझ्या मर्यादांची खरी परीक्षा घ्यायची असेल तर ती फक्त एका गोष्टीत घेणं गरजेचं आहे, एका वेळी १०० गोष्टी करून फक्त गुंता होतो, हाती काहीच लागत नाही हे मी २९ वर्षात नीट शिकलोय.

म्हणून आता मी माझा संपूर्ण वेळ स्वतःच्या चंचलतेवर विजय मिळवण्यासाठी दिलाय. पुढचं पुढे बघता येईल. कठीण आहे, रोज सकाळी उठल्यावर स्वतःला सांगणं की आज कुठेही विचलित व्हायचं नाहीये, पण आपल्याला कुठे घाई आहे? वेळ आपलीच तर आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top